Protected by Copyscape DMCA Takedown Notice Infringement Search Tool

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

छटा

कोणता ना कोणता व्यत्यय असू दे
ही उदासीची छटा अक्षय असू दे
मी रसातळ गाठण्यावर ठाम आहे
शक्य तितका काळही निर्दय असू दे
सर्व टोलेजंग वास्तू पाड इथल्या
तेवढे हे भग्न देवालय असू दे
शांतता बाहेरची संत्रस्त करते
आतल्या दंग्यात मन तन्मय असू दे
भाव खालावेल सूर्यास्ताबरोबर
तळपता तोवर सुरू विक्रय असू दे

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

अमल

खूप दिवसांनी भिजू सोन्यात चल
पसरला गावावरी पिवळा अमल

हात एकच मार स्थित्यंतर घडव
फार झाले तेच ते छुटपुट बदल

सर्व पुंजी फुंकुनी आलास पण
वाटली कोठे तुला खर्चिक सहल

आक्रमण कर आणि हो की मोकळा
युद्धनीतीवर किती करतोस खल

जिंकला कोणी कसा शिकणे नको
तो कसा स्पर्धेत ह्याचे कर नवल

निग्रहाने सोड इवला खंड हा
वाट पाहू लागले मोठे प्रतल
-------
विजय दिनकर पाटील

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४

आजच्या आज

स्नेह निर्व्याज पाहिजे होता
आजच्या आज पाहिजे होता

ही अदाही बरीच आहे पण
वेगळा बाज पाहिजे होता

तान आहे तशी तयारीची
स्वच्छ आवाज पाहिजे होता

कसनुसे का हसून गेला तो
स्पष्ट नाराज पाहिजे होता

बडवतो काळ दोन बाजूंनी
जन्म पखवाज पाहिजे होता

शनिवार, १९ जुलै, २०१४

जे जगतो ते लिहिणारा

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे
दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे
दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
दूर जा जरा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे
नसेल त्याच्याकडून झाले निराकरण दु:खाचे
धीर दिलेला सावरताना निश्चित पूरक आहे
तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे
-----------------------
विजय दिनकर पाटील

शुक्रवार, ११ जुलै, २०१४

शेर

घाईत ह्या पोचायच्या पाऊस आला नेमका
येथेच आहे घर चला छत्री नको उघडायला

मंगळवार, ८ जुलै, २०१४

नवे शेर

तिष्ठायचे कोणी कुणासाठी कशाला
आपापला उद्योग प्रत्येकास आहे

----

करपाडीला(*) दारीद्र्याचा बक्कळ पाउस पडतो बहुधा
छोटी छोटी किती खोपटी उगवतात दररोज नव्याने


करपाडी - डोंगराचा उतरता भाग

बुधवार, ४ जून, २०१४

वर्तुळे

मनांची मोडलेली वर्तुळे जोडून जाताना
कशाची खंत नाही राहिली येथून जाताना
अधोरेखीत झाले दोष माझ्या पोहण्यामधले
तुझ्या डोळ्यांतल्या लाटांसवे वाहून जाताना
तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना
कुठे जाणार ह्याची योजना मांडू कशासाठी
ठरवतो मागचा रेटाच लोंढ्यातून जाताना
तुझीही हार माझाही पराभव ह्या निरोपाने
तुला घेऊन येतो मी मला सोडून जाताना
---------
विजय दिनकर पाटील