Protected by Copyscape DMCA Takedown Notice Infringement Search Tool

रविवार, ३ डिसेंबर, २०१७

तीन गझला

नका चिंता करू शनिवार असताना
इथे सारेच कर्तबगार असताना
इथे थांबून जमते तेवढे मिळवू
कुठे भटकायचे घरदार असताना
किती चालायचे रेषेत एका मी
इथे रस्ताच वक्राकार असताना
कसे शोभेल आपण मोडणे आता
ठरत आल्यापरी व्यवहार असताना
नको बाहेर पडणे आणि गारठणे
पुरेसा कोष हा उबदार असताना
परत जाऊ नको तू रिक्त हातांनी
उभा डोळ्यांपुढे बाजार असताना
तुला टाळायचा ज्वर का बरे येतो
मला भेटायचा आजार असताना
किती तो जीवनाशी वाटतो समरस
व्यथांची पालखी निघणार असताना
तुझ्या शर्थीमुळे तर हा दिवस दिसला
कुठे लपलास तू सत्कार असताना
उरकल्यासारखे का वाटते जगणे
पुढे कित्येक सोपस्कार असताना
-------------------
होणे नाही इथून पुढचे बदल वाटते
एवढीच होती का अपुली मजल वाटते
कुठेतरी एखादी कळ उठलीच पाहिजे
कुठेच नाही दुखले तर मग नवल वाटते
प्रथम प्रयत्नामधेच संधी हुकली होती
उगाच मग मन खात राहिले उचल वाटते
कसल्या वैराग्याचे सावट जग पांघरते
जितके उन्नत होते तितके विफल वाटते
जाताना तर नव्हते इतके नीटनेटके
खूपच मोठी झाली अदलाबदल वाटते
अकस्मात वातावरणाचा नूर बदलला
ह्याही गावी आली तुमची सहल वाटते
--------------------
जगाचे लाड साला खूप झाले
उभे कापू जगाला....खूप झाले
जमत नाही तुला तर धाड दुसरा
मला कोरम मिळाला खूप झाले
कुणाला हौस आहे सिक्स पॅक्ची
जरासा घाम आला खूप झाले
जमीनीची कदाचित खैर नाही
उचलणारे नभाला खूप झाले
तुझे कर्तृत्व नव्हते फार काही
तुझा उल्लेख झाला खूप झाले
-----------------

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

दोन गझला

१.

मीर वली वा गालिबचे वंशज कोणी
येथेही आहेत म्हणे दिग्गज कोणी
रोजच देश नव्याने जन्मत असताना
अर्ध्यावर आणून ठेवला ध्वज कोणी
चहूकडे दिसतात पारधी फिरताना
उत्सुक नाही बनायला सावज कोणी
किती उधळशील व्यर्थ मोती शब्दांचे
दिला तुला हा लाखांचा ऐवज कोणी
लाड पुरेसे जन्माने केलेच कुठे
पाठव मृत्यू नावाचा अग्रज कोणी

२.

उत्सव कशाचे साजरे झाले
वातावरण तर बोचरे झाले
चौकात रहदारी सुकर झाली
सिग्नल बसवला ते बरे झाले
अभ्यास काही काळिजे आता
पुष्कळ त-हांचे चेहरे झाले
काही समुद्रांच्या नद्या झाल्या
काही नद्यांचेही झरे झाले

कोणास केले अलविदा आपण
की हात इतके कापरे झाले

मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

नवी गझल

जुमानेनाच जर हे तण कशाला
इमानाने करू खुरपण कशाला
तसे राहूच आपण ओळखीचे
परंतू फ़ारशी घसटण कशाला
पुढे लागेल की नंबर तुझाही
तुला आताच ते दडपण कशाला
हवा पाणी मने सारेच दूषित
इथे नाही तुझी लागण कशाला
समेटाची गरज आहे मलाही
पुन्हा उकरू जुने प्रकरण कशाला

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

समकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा

स्थळः स्नेहसदन सभागृह, नारायण पेठ पौलीस चौकी जवळ, शनिवार पेठ पुणे ३०
वेळः २१ नोव्हेंबर, संध्याकाळी ५.०० ते ८.००
गझल चर्चा: गझल आशय, स्वरूप आणि इतर गोष्टी
सहभाग : चित्तरंजन भट, विजय दिनकर पाटील, समीर चव्हाण, अनंत ढवळे
गझल वाचन
सहभाग : समीर चव्हाण, चित्तरंजन भट, विजय दिनकर पाटील, कैलास गायकवाड, संजय कुलकर्णी, प्रसाद लिमये, इंद्रजीत उगले, आणि अनंत ढवळे
जरूर उपस्थित रहावे.

बुधवार, २७ मे, २०१५

गझल

धाट उभे करण्या जन्माचा काला करणारे
कुठे लोपले…. नवे कोण हे हुरडा करणारे
पेटवायला चूल निखारे वेचतात बहुधा
उन्हामधे रणरणत्या प्लास्टिक गोळा करणारे
एक लाट येऊन विस्कटू शकते जाणुनही
दंग कसे इतके वाळूचा किल्ला करणारे
मांडल्याच नाहीत मागण्या संगतवार कुणी
हात रिकामे हलवत गेले गलका करणारे
चलू पुढे की मागे परतू हेच कळत नाही
ये म्हणणारे जितके तितके जा जा करणारे
जरी शाश्वती नव्हती पिल्ले राहतील का ही
केवळ श्रद्धेखातर झटले खोपा करणारे
मी स्वप्नांची पायवाट रुळवत आलो इथवर
बघू कधी येते वास्तवही धुरळा करणारे
---------
सुमारपण व्यासंगाच्या वर्खात बुडवल्यावर
भेटत गेले बक्कळ दादा बाबा करणारे

- विजय दिनकर पाटील

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

नवे शेर

धाडसे नको ती रोखू शकली आहे
ती हवीहवीशी भीती कसली आहे

--------

केवढा पगडा निराशेचा
काढ अंगरखा निराशेचा

--------

पुढे काही करू किंवा रिकामेही फिरू
क्षणापुरतीतरी ह्या, फक्त विश्रांती हवी 

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

छटा

कोणता ना कोणता व्यत्यय असू दे
ही उदासीची छटा अक्षय असू दे
मी रसातळ गाठण्यावर ठाम आहे
शक्य तितका काळही निर्दय असू दे
सर्व टोलेजंग वास्तू पाड इथल्या
तेवढे हे भग्न देवालय असू दे
शांतता बाहेरची संत्रस्त करते
आतल्या दंग्यात मन तन्मय असू दे
भाव खालावेल सूर्यास्ताबरोबर
तळपता तोवर सुरू विक्रय असू दे