Protected by Copyscape DMCA Takedown Notice Infringement Search Tool

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

नवे शेर

धाडसे नको ती रोखू शकली आहे
ती हवीहवीशी भीती कसली आहे

--------

केवढा पगडा निराशेचा
काढ अंगरखा निराशेचा

--------

पुढे काही करू किंवा रिकामेही फिरू
क्षणापुरतीतरी ह्या, फक्त विश्रांती हवी 

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

छटा

कोणता ना कोणता व्यत्यय असू दे
ही उदासीची छटा अक्षय असू दे
मी रसातळ गाठण्यावर ठाम आहे
शक्य तितका काळही निर्दय असू दे
सर्व टोलेजंग वास्तू पाड इथल्या
तेवढे हे भग्न देवालय असू दे
शांतता बाहेरची संत्रस्त करते
आतल्या दंग्यात मन तन्मय असू दे
भाव खालावेल सूर्यास्ताबरोबर
तळपता तोवर सुरू विक्रय असू दे

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

अमल

खूप दिवसांनी भिजू सोन्यात चल
पसरला गावावरी पिवळा अमल

हात एकच मार स्थित्यंतर घडव
फार झाले तेच ते छुटपुट बदल

सर्व पुंजी फुंकुनी आलास पण
वाटली कोठे तुला खर्चिक सहल

आक्रमण कर आणि हो की मोकळा
युद्धनीतीवर किती करतोस खल

जिंकला कोणी कसा शिकणे नको
तो कसा स्पर्धेत ह्याचे कर नवल

निग्रहाने सोड इवला खंड हा
वाट पाहू लागले मोठे प्रतल
-------
विजय दिनकर पाटील

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४

आजच्या आज

स्नेह निर्व्याज पाहिजे होता
आजच्या आज पाहिजे होता

ही अदाही बरीच आहे पण
वेगळा बाज पाहिजे होता

तान आहे तशी तयारीची
स्वच्छ आवाज पाहिजे होता

कसनुसे का हसून गेला तो
स्पष्ट नाराज पाहिजे होता

बडवतो काळ दोन बाजूंनी
जन्म पखवाज पाहिजे होता

शनिवार, १९ जुलै, २०१४

जे जगतो ते लिहिणारा

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे
दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे
दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
दूर जा जरा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे
नसेल त्याच्याकडून झाले निराकरण दु:खाचे
धीर दिलेला सावरताना निश्चित पूरक आहे
तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे
-----------------------
विजय दिनकर पाटील

शुक्रवार, ११ जुलै, २०१४

शेर

घाईत ह्या पोचायच्या पाऊस आला नेमका
येथेच आहे घर चला छत्री नको उघडायला

मंगळवार, ८ जुलै, २०१४

नवे शेर

तिष्ठायचे कोणी कुणासाठी कशाला
आपापला उद्योग प्रत्येकास आहे

----

करपाडीला(*) दारीद्र्याचा बक्कळ पाउस पडतो बहुधा
छोटी छोटी किती खोपटी उगवतात दररोज नव्याने


करपाडी - डोंगराचा उतरता भाग

बुधवार, ४ जून, २०१४

वर्तुळे

मनांची मोडलेली वर्तुळे जोडून जाताना
कशाची खंत नाही राहिली येथून जाताना
अधोरेखीत झाले दोष माझ्या पोहण्यामधले
तुझ्या डोळ्यांतल्या लाटांसवे वाहून जाताना
तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना
कुठे जाणार ह्याची योजना मांडू कशासाठी
ठरवतो मागचा रेटाच लोंढ्यातून जाताना
तुझीही हार माझाही पराभव ह्या निरोपाने
तुला घेऊन येतो मी मला सोडून जाताना
---------
विजय दिनकर पाटील

शुक्रवार, २३ मे, २०१४

ही लाली, ही पावडर, हे ठुमके!

ते चारजण की त्या चारजणी
रोजच दिसतात
कोपरखैरणे स्टेशनच्या एका
गर्दीने न व्यापलेल्या कोप-यात
नट्टापट्टा करताना
त्यांच्यात किंवा त्या नट्टयापट्टयात
काय जादू असते ठाऊक नाही
मात्र
येणा-या जाणा-या असंख्य माना
वळून पाहील्याखेरीज जात नाहीत
दोघांचाही नेमका उद्देश मात्र समजत नाही
नट्टयापट्टयाचाही आणि नजरांचाही
नजरांमधे,
कुतूहल, कीव, घॄणा की वासना
की एक मोठा शून्य...
रोजच्याच यंत्रवत हालचालींचा एक भाग
टाळी वाजवून हात पुढे करताना
वर बघायलासुद्धा वेळ नसणा-याला
वाटलेच तर मिळेल ते घेऊन
पुढची टाळी वाजवायला
चालू पडणा-या
नट्टयापट्टयात तरी शॄंगार कुठला
कुठले/ल्या तरी आहोत आम्हीही
हे ठसविण्याची
केविलवाणी धडपड तर नसेल
ही लाली, ही पावडर, हे ठुमके!
-----
विजय दिनकर पाटील

रविवार, ४ मे, २०१४

"कविता"(विशेषकरून आंतरजालावरची)

श्री. अनंत ढवळे ह्यांच्याशी काल(०३.०५.२०१४) अस्मादिकांची "कविता"(विशेषकरून आंतरजालावरची) ह्या विषयावर नाशिक येथे सविस्तर चर्चा झाली त्यातून काही विचारप्रवर्तक मुद्दे पुढे आले ते समस्त काव्यप्रेमी लोकांसाठी इथे देत आहे,

१.  आंतरजालाच्या अनिर्बंध उपलब्धतेमुळे इथे लेखनापेक्षा त्याच्या मूल्यमापनाला अधिक महत्व दिले जात आहे जे कवितेस बाधक आहे.

२. कवींमधे श्रेष्ठ / कनिष्ठ / उत्तम / सर्वोत्तम हे भेद अनाठायी असून जो तो आपापल्या पात्रतेनुसार लिहित असतो.

३. चांगली कविता कितीही टीका केली तरी टिकून रहाते आणि खराब कवितेला कितीही उचलून धरली तरी तिचा बहर ओसरतो, ती संपते.

४. मराठी गझलेत 'सुरेश भटांनंतर कोण' हा वाद निरर्थक असून कवींनी ह्यात न पडता दर्जेदार काव्य निर्मितीवर भर दिला पाहिजे. कुणानंतर कोण हे काळच ठरवत असतो. त्यामुळे लिहिणा-यांनी असे वाद छेडून आपला बहुमुल्य वेळ दवड्ण्यात हशील नाही.

नको निष्कर्ष काढू एवढ्यातच तू
करू दे काळ त्याचे काम शिस्तीने

धन्यवाद!

सोमवार, २१ एप्रिल, २०१४

घाम

आणखी खोदायचे आता तरी सोडून दे तू
जेवढे पाणी हवे त्याहून जास्ती घाम गेला

आचारसंहीता

माणूस दोनच प्रकारचे लिहू शकतो.

गद्य आणि पद्य!

ह्य दोन्ही प्रकारांमधे सामावलेल्या अनेक उपप्रकारांतील कशाची निवड स्वत:ला  व्यक्त करण्यासाठी करायची हे सर्वस्वी लिहीणा-याचा कल, त्याने केलेला अभ्यास, त्याने आत्मसात केलेले लेखन कौशल्य, देऊ शकत असलेला वेळ ह्या आणि केवळ ह्याच गोष्टींवर अवलंबून असते.

परंतू हे उपप्रकार हाताळणा-यांच्या डोक्यात सध्या एक भ्रम स्थिरावत आहे असे दिसून येत आहे. लिहीत असलेल्या उपप्रकाराचा आकृतीबंध अधिक कौशल्याची मागणी करीत असल्यामुळे काही विशिष्ट लिहीणा-यांमधे एक अचिव्हमेन्ट्चा अहंकार बळावताना दिसून येत आहे. त्यामुळे आपण कशावरही आणि कुठल्याही भाषेत मत देऊ शकतो असे त्यांना वाटू लागलेले आहे.

प्रकार कुठलाही असला तरी तो प्रथम तो ’पद्य’ किंवा ’गद्य’ ह्या दोन कसोट्यांवर तपासला गेला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला ओवी ह्या उपप्रकारात व्यक्त व्हायचे असेल तर ओवीचा आकृतीबंध  पाळण्याआधी आपण लिहितो त्यात ’पद्य’ कितपत आहे हे त्रयस्थपणे तपासून पाहीले पाहिजे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी. कवितेत काव्य नसून बाकी सगळे असले तर काय उपयोग?

अल्पश: किंवा अजिबात नसलेल्या ज्ञानाच्या  बळावर आपण स्थिरावायला धडपडत आहोत त्या साहीत्यप्रकारात हवे तितके सोयीचे राजकारण करता आले की जीवनाचे सार्थक झाले असे मानना-या लेखक/कवींच्या संख्यमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

निवडणुका सुरू आहेत, काही ठिकाणी अजून मतदान व्हायचे आहे. देश चालवायला उत्सुक असलेल्या सर्वच पक्षांची अस्तित्वाची धडपड सुरू आहे परंतू सामान्य नागरीकाला वात आणणा-या ह्या सत्तास्पर्धेलाही काही ’आचारसंहीता’ आहे जी कटाक्शाने पाळली जात आहे. साहीत्यातल्या सोयीच्या राजकारणाच्या आखाड्यात अशी काही आचारसंहीताच नाही म्हणून ज्याला जे वाट्टेल तो ते बरळू लागलेला आहे! ह्या सगळ्या गदारोळात अलिप्त राहून साहित्यसेवा करणारे काही मोजके लिहिणारे आहेत आता त्यांनाच पुढे येऊन ही थेरं रोखण्याकरीता काहीतरी करावे लागेल अशी वेळ आलेली आहे.

मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

दोन जुन्या गझला

टाळशील का जाताना हे भेदक नजरा रुतवत जाणे
सोसत नाही असे नेहमी माझे माझ्यादेखत जाणे
तुमची गाडी गंतव्याला घेउन जाते म्हणून केवळ
तुम्ही न पटले तरी निवडले असे यंत्रवत सोबत जाणे
मंदिरामधे गर्दी दिसते समर्पणाच्या नावाखाली
कोण कशाला आला हे तो भक्तच अथवा दैवत जाणे
प्रकट होउ दे आश्वासकता जी स्पर्शातुन बोलत असते
चर्येवरती दाखव आता माझ्यामधले गुंतत जाणे
वार्धक्याने ’कणखर’ जीवन शिथील होवो चिंता नाही
पुढची वर्षे तरूण ठेविल पदोपदीचे किंमत जाणे
मे २०१२
-----------
असे अचानक बनात आले कुठून पाणी
तरारली ती मलूल झाडे बघून पाणी
तहानलेली नदी प्रतिक्षा करून थकली
नि यायचे नाव घेत नाही अजून पाणी
तुझ्या शिवारी हरेक वाफा तहानलेला
अखंड सिंचन करून गेले थकून पाणी
दुकाळ सरताच ओळखेना कुणी कुणाला
सबंध गावास चालले मातवून पाणी
नभास नाही कधीच भेटायचे धरेला
अता अपेक्षा करील कोणाकडून पाणी
डिसेंबर २०१२

शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

खुणा

प्रयाणाचा दिवस जाहीर कर, निश्चिंत हो
तुझ्यादेखत तुझ्या सार्‍या खुणा आम्ही पुसू

मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

फरफट

सिद्धी आणि प्रसिद्धी मोठ्या कजाग सवती
दोघीही पाहिजेत म्हणजे फरफट निश्चित

बुधवार, १९ मार्च, २०१४

सुटे शेर


कडाक्याचा इरादा नेक नाही
तिरिप येतेय छोटी हे जमेचे

--

कोण कुठे वसलेय दिसेना ह्या अंधारामध्ये
दूर दिवा मिणमिणतो तेथे वास तुझा मानावा

--

नमस्ते हाय पेक्षा वेगळे बोलू
जरासा मोकळा हो मोकळे बोलू

--

जीवनभर ह्याची ना त्याची झालो काठी जगण्याची
डोळयांदेखत वेळ निसटली माझ्यासाठी जगण्याची

--

देखण्या गावास देहाची सहल ठरली
पाहतो येतात सोबत कोणत्या व्याधी

--

मंगळवार, १८ मार्च, २०१४

बोचरे वारे

बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे

तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे

आल्हाद नाही देत ही झुळझुळ हवा
धाडा जरासे बोचरे वारे इथे


--------------

ह्याच धबडग्याशी निष्ठेने झुंजत राहू
हॄदयावरती किती ताण येतो ते पाहू

हे काळेपण कापत जाऊ त्या टोकाला
एक पांढरा ठिपका दिसतो पसरुन बाहू

चुकूनसुद्धा पाउस इकडे फिरकत नाही
किती फायदा हा दिसण्‍याचा कोरडवाहू

मरून गेलेला आहे तो सोडा त्याला
कलेवरावर चालत नसते असली हा हू

रक्तातच जर मिसळणार असली नवधारा
जुने म्हणा पण मूळ प्रवाहासोबत वाहू


-------------------

अस्वस्थते वेगातली स्थित्यंतरे थांबव तुझी
आयुष्यभर मेंदूमधे मी नांदवत आलो तुला

थकल्या शरीरावर नको ना गाजवू अंमल तुझा
आता तशी शक्तीच नाही राहिली देहात ह्या

केव्हा कुठे होईल काही नेम नाही वाटते
झाले जरासे खुट्ट की आपादमस्तक हालतो

सावट भयाचे वागवत एकेक अवयव राहतो
पाठीत येते कळ तशी छातीत धडधड वाढते

जगण्यातले स्वारस्य तर अद्याप नाही संपले
पण ती जुनी उत्फुल्लता केवळ हवी आहे परत

अस्वस्थते वेगातली स्थित्यंतरे थांबव तुझी

भाषा

कोण जाणे कोणत्या भाषेत मी रेखाटतो
एकदाही जात नाही ह्या मनीचे त्या मनी

गुरुवार, १३ मार्च, २०१४

व्यर्थ घालवू नका संपदा मला जगविण्यासाठी
इच्छा मेल्यावर काहीही उपाय चालत नसतो 
म्हातार्‍याचा अंत्यविधी थोड्या वेळाने उरकू
एक बारसे आहे तेथे पंगत झोडुन येतो